जिंकणाऱ्यांच्या आनंदात सहभागी होऊन हारणाऱ्या विद्यार्थ्यांनी दाखवली खिलाडूवृत्ती

एकत्र नाचत साजरा केला आनंदोत्सव

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचा समारोप येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर झाला. या क्रीडा स्पर्धेत कारवाफा बिट विजेता, तर भाडभिडी बिटने उपविजेतेपद प्राप्त केले. विजेत्या व उपविजेत्या संघाला जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल व मान्यवरांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. यानंतर संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला. विशेष म्हणजे जिंकणाऱ्यांच्या आनंदात हारणाऱ्या संघातील खेळाडूंनीही सहभागी होऊन खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ.प्रभु सादमवार, सुधाकर गौरकर, कार्यालयीन अधीक्षक वासुदेव उसेंडी, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापक सुनील नन्नेवार, अजय आखाडे, एस.आर.मंडलवार, विजय देवतळे, माजी विभागीय क्रीडा समन्वयक प्रेमलाल कोरंडे, गणेश पराते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना, तसेच उत्कृष्ट वृत्तलेखन केल्याबद्दल प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. संमेलनात कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील २४ शासकीय, तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील सुमारे ११०० खेळाडूंनी सहभाग घेतला. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले आदी सांघिक तर लांबउडी, उंचउडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळांचे आयोजन केले होते.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके यांनी केले. सांघिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन सुभाष लांडे व बळीराम जायभाये तर वैयक्तिक खेळाच्या पारितोषिक वितरणाचे संचालन प्रतिभा बनाईत यांनी केले. सतीश पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या तीन दिवसीय क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पाचही बिटमधील क्रीडा निरीक्षक आशिष ढबाले, नागनाथ पवार, मोहन मारबते, जयप्रकाश गायकवाड, निलय गडे, पुरुषोत्तम बखर, रविकांत पिपरे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार, गुलाब डोंगरवार, संदीप राठोड, यशपाल पेंदाम, रामदास पिलारे, आशिष नंदनवार, संगीता मोडक, शारदा कोटांगले, विलास मडावी, डाकराम धोंगडे, क्रीडा मार्गदर्शक, शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी, पंच व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.