गडचिरोली : मोदींच्या विकासाच्या गाडीत सर्व समाजघटकांना बसण्यासाठी जागा आहे. पण महाविकास आघाडीच्या गाडीला डबेच नाहीत, त्यांच्याकडील सर्व पक्षांच्या नेत्यांना मीच इंजिन आहे असे वाटते. हे सर्व इंजिन वेगवेगळ्या दिशेने ओढतात, अशी टिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धानोरा येथे झालेल्या महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
विशेष म्हणजे यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पुन्हा एकदा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर तोंडसुख घेतले. गडचिरोली जिल्ह्यातील रेती आणि दारू तस्करी करणारे हेच असल्याचा आरोप त्यांनी केला. एवढेच नाही तर त्यांच्या काँग्रेस प्रवेशावरून उठलेल्या वावड्यांवर येत्या दि.१८ ला खुलासा करणार असल्याचे सांगितले.
मुस्लिम, दलित, आदिवासींना सर्वोच्च पदावर बसविणारा भाजप जातीयवादी कसा?
भाजपला जातीयवादी पक्ष म्हणत नेहमी बोंबा मारणाऱ्या विरोधकांना भाजपच्या कार्यकाळात झालेली विकास कामे दिसत नाही. भाजप सरकारने सर्वोच्चस्थानी बसविलेल्या व्यक्तीही दिसत नाही. राष्ट्रपतीपदावर एपीजे अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद, द्रौपदी मुर्मू अशा मुस्लिम, दलित आणि आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींना केवळ भाजपच्या कार्यकाळात संधी मिळाली. तरीही भाजप जातीयवादी पक्ष कसा? असा सवाल करत महायुतीचे उमेदवार खासदार अशोक नेते यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.
यावेळी खा.नेते यांनी खरे जातीयवादी काँग्रेसच असल्याचा आरोप केला. १० वर्षात काय केले या विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना त्यांनी वडसा ते गडचिरोली, तसेच चिमूर, काम्पा-टेम्पा, वरोरा या आणि छत्तीसगड तथा तेलंगणापर्यंत जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणाची मंजुरी, मोठ्या प्रमाणात महामार्ग आणि पूल, मेडीकल कॅालेज, लोहउद्योग, सिंचन प्रकल्प, पूलकम बंधारे अशा अनेक कामांची यादी असल्याचे सांगितले. केंद्र सरकारचा कामे करण्याचा धडाका, मागास भागाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी चाललेली धडपड याला पाठबळ म्हणून मला पुन्हा या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन त्यांनी केले. त्यासाठी येत्या १९ एप्रिलला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॅा.आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन
जाहीर सभेपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा.अशोक नेते, आ.डॅा.देवराव होळी यांनी धानोराच्या बाजार चौकात असलेल्या भारतरत्न डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जयजयकार केला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.
आमगाव येथील सभेपूर्वीही अभिवादन
आमगाव येथे मुख्य चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला महायुतीचे उमेदवार तथा खा.अशोक नेते यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खा.नेते यांच्या हस्ते अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा महामंत्री अनिल येरणे, भाजपचे ज्येष्ठ नेते घनश्याम अग्रवाल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके तसेच मोठ्या संख्येने नागरिक व बौद्ध बांधव उपस्थित होते.