गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसच्या युवा उमेदवाराला संधी द्या

आदिवासी काँग्रेसची प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याकडे मागणी

गडचिरोली : अनेक वर्ष ज्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसचे वर्चस्व होते, त्या मतदार संघावर आता आघाडीतील इतर घटक पक्षांचा डोळा आहे. परंतू हा मतदार संघ काँग्रेसकडेच ठेवला जावा आणि त्यातून युवा नेत्याला संधी द्यावी, अशी मागणी आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदन देऊन केली.

शेडमाके यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मुंबईत नाना पटोले यांची भेट घेऊन या मतदार संघात काँग्रेसलाच कसे पोषक वातावरण आहे हे सांगितले. एसटी राखीव असलेल्या या मतदार संघात आदिवासी, दलित,ओबीसी, अल्पसंख्यांक आणि बहुजन समाजाचे प्राबल्य आहे. आतापर्यंत या मतदार संघातून काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढवित असताना आता मात्र महाविकास आघाडीकडून राज्यात काँग्रेसच्या वाट्याला १६ ते १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात गडचिरोली-चिमूर हा मतदार संघही काँग्रेसकडेच ठेवावा, अशी मागणी शेडमाके यांनी केली.

विशेष म्हणजे या मतदार संघातील युवक मतदार अधिक उत्साही आणि जागरूक आहे. त्यामुळे काँग्रेसकडून युवा नेतृत्व म्हणून छगन शेडमाके यांना उमेदवारी देण्याचा आग्रह यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे केला. त्यावर नाना पटोले यांनी सक्षम आणि मेरिटच्या आधारे, चांगले काम करणाऱ्याला उमेदवारी दिली जाईल, अशी ग्वाही दिली.