गांजा तस्करीप्रकरणी आणखी एकाला अटक

गडचिरोलीतच गांजाची शेती, की छत्तीसगडमधून करतात आयात? शोध सुरू

गडचिरोली : दोन दिवसांपूर्वी मुलचेरा आणि गोंडपिपरी पोलिसांनी कर्नाटक राज्यात घेऊन जात असलेल्या १२ किलो गांजासह बापलेकांना पकडले होते. हा गांजा त्यांनी ज्याच्याकडून घेतला होता त्या भवानीपूर येथील शंकर सुरेन हलदार यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या तीन झाली आहे. मात्र हलदार याच्याकडे गांजा आला कुठून हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात गांजाची शेती तर केली जात नाही ना? अशी शंका यामुळे उपस्थित केली जात आहे.

आठवडाभरापूर्वी धानोरा तालुक्यातूनही अशाच पद्धतीने एका वाहनातून गांजाची चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले होते. त्याचा तपास सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी मुलचेरा तालुक्यातून गांजाची तस्करी होत असल्याचे आढळून आले.

मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या भवानीपूर येथील आरोपी शंकर हलदार याने तो गांजा छत्तीसगड मधील अनोळखी व्यक्तीने पुरविल्याचे पोलिसांना सांगितले. पण त्या व्यक्तीचे नाव, पत्ता माहित नसल्याचे तो सांगत असल्याने आरोपी शंकर तर गांजाची शेती करत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात जप्त केलेला गांजा नेमका कुठून आला याचा छडा लावून संबंधित आरोपीलाही पकडले जाईल, असा विश्वास मुलचेराचे पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांनी ‘कटाक्ष’सोबत बोलताना व्यक्त केला.

गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर, कर्नाटकपर्यंत गांजा जाणे आश्चर्यकारक ठरत आहे. दारूबंदी असलेला गडचिरोली जिल्हा आता गांजा तस्करीचे केंद्र तर होत नाही ना, अशी भिती या घटनांमुळे निर्माण झाली आहे.