गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीतून आम्हीच लढवणार असा दावा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) पदाधिकारीही दावा सांगण्यासाठी सरसावली आहेत. या पक्षाचे नेते आणि आरमोरी विधानसभा मतदार संघात दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटवर निवडणूक आलेल्या माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी लोकसभेची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी केली आहे. गडचिरोलीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली ही मागणी मांडली.
गडचिरोली-चिमूर मतदार संघात गेल्या तीन लोकसभा निवडणुका काँग्रेसने लढवून त्यापैकी दोन निवडणुकांमध्ये त्यांना सलग पराभव पत्करावा लागला. काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसचीही साथ असल्यामुळे त्या पराभवात राष्ट्रवादी काँग्रेसचाही वाटा होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून यावेळी शिवसेनेसाठी ही जागा सोडावी, असा युक्तीवाद मडावी यांनी केला.
लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभरापेक्षाही कमी कालावधी शिल्लक असल्याने सर्व प्रमुख पक्षांनी तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धर्मरावबाबा आत्राम यांनी लोकसभा लढविणार असल्याचे जाहीर केले. पण काँग्रेसने पक्षश्रेष्ठींचा हवाला देत ही जागा आम्हीच लढवणार असल्याचे सांगितले. त्यात आता महाविकास आघाडीतील तिसऱ्या पक्षानेही उडी घेत दावा सांगितला.