राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार

५ जुलैला दीक्षांत समारंभ, राज्यपालांसह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ येत्या ५ जुलै रोजी विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमुळे हा समारंभ ऐतिहासिक ठरणार आहे. यावेळी विविध अभ्यासक्रमात एकापेक्षा जास्त सुवर्णपदक पटकावणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सत्कार केला जाणार आहे. याशिवाय अडपल्ली-गोगाव परिसरात विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जागेवर विद्यापीठाच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते रिमोट कंट्रोलने केले जाईल, अशी माहिती कुलगुरू डॅा.प्रशांत बोकारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती गडचिरोली जिल्ह्यात येत आहे. नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल जिल्ह्यात येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती ठरणार आहे. याबद्दल अधिक माहिती देताना कुलगुरू डॅा.बोकारे म्हणाले, ज्यावेळी या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रपतींना भेटलो त्यावेळी त्यांनी या आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यात येण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे सांगितले. या भागातील युवकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी मला या जिल्ह्यात यायला आवडेल, असे म्हणत राष्ट्रपतींनी हे निमंत्रण स्वीकारले.

या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दीक्षांत भाषण करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस राहतील. याशिवाय विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे व प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

पत्रपरिषदेला कुलसचिव डॅा.हिरेखन, अधिष्ठाता डॅा.अनिल चिताडे, लेखा व वित्त अधिकारी चंद्रमौली, प्रा.देवेंद्र झाडे आदी उपस्थित होते.

३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके; १३७ आचार्य पदवी
दीक्षांत समारंभात गौरविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी २७८, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ६२, सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ३९, तर आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३७ आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ४५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ८, मानव विज्ञान विद्याशाखेचे ५४, आंतरविज्ञान विद्याशाखेच्या ३० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठात पदवीप्राप्त विद्यार्थी तब्बल २० हजार ५३५ आहेत. यात पदवीचे १५२३० आणि पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण होणारे ५३०५ विद्यार्थी आहेत.

दोन मागण्यांवर विद्यापीठाची राहणार भर
गोंडवाना विद्यापीठाला आदिवासी आणि वन विद्यापीठाचा दर्जा देण्याची घोषणा पाहुण्यांनी करावी. तसेच विद्यापीठाच्या एकूण विकास आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामांसाठी निधीची घोषणा करावी, अशी अपेक्षा विद्यापीठ प्रशासनाकडून केली जात आहे. त्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला.