गडचिरोली : जिल्ह्यात रविवारी झालेल्या २४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ३ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी (दि.७) जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत सर्वाधिक ८ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे सरपंच निवडून आल्याचा दावा या पक्षाने केला आहे. याशिवाय भाजपचे ६ सरपंच झाले आहेत. त्यामुळे २४ पैकी १४ सरपंच निवडून आणून महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले असले तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला (शिंदे) भोपळा फोडता आलेला नाही.
या निवडणुकीत काँग्रेसला ३, आदिवासी विद्यार्थी संघाला ३, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला १ तर दोन ग्रामपंचायतीत ग्रामसभा आणि अपक्ष सरपंच निवडून आले आहेत.
भामरागड तालुक्यातील ६ पैकी टेकला, बोटनफुंडी, पल्ली, एटापल्ली तालुक्यातील जांभिया, नागुलवाही, हालेवारा, अहेरी तालुक्यातील दोनपैकी राजाराम, सिरोंचा तालुक्यातील एकमेव कोटापल्ली ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार विराजमान झाले आहेत. तर धानोरा तालुक्यात पन्नेमारा व मुंगनेर येथे काँग्रेस आणि काँग्रेस समर्थित अपक्षाने बाजी मारली. कोरची तालुक्यात भाजपला कोटरा, बोदालदंड, नवेझरी, सातपुती व जांभळी आदी पाच ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे पिटेसूर व मुरकुटी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अहेरी तालुक्याच्या आवलमारी, भामरागड तालुक्यातील मडवेली व आरेवाडा आदी ग्रामपंचायतीवर अजय कंकडालवार यांच्या आविसंचा झेंडा, तर इरकडुम्मे ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले.