राणी दुर्गावती शाळेच्या सलोनी करपेची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड

आतापर्यंत स्काऊट-गाईडच्या १६ विद्यार्थिनी पात्र

गडचिरोली : भारत स्काऊटस् आणि गाईडस् दिल्लीतर्फे राष्ट्रपती पुरस्कारासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गडचिरोलीतील राणी दुर्गावती कन्या शाळेच्या सलोनी संजय करपे हिने बाजी मारत राष्ट्रपती पुरस्कारासाठी आपले नाव निश्चित केले. यावर्षीची परीक्षा नागपूर येथे पार पडली. यात गडचिरोली जिल्ह्यातून १० मुली सहभागी झाल्या होत्या.

सलोनी हिच्यासोबत पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल, आरमोरी येथील देवयानी विलास नंदनवार हिने सुद्धा राष्ट्रपती पुरस्कार परिक्षेत यश प्राप्न केले आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना देशाच्या राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात येते. या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीसाठी १० गुण वाढीव स्वरूपात मिळतात.

विशेष म्हणजे राणी दुर्गावती शाळेच्या आतापर्यंत १६ मुलींना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या शाळेत स्काऊट-गाईडची इयत्ता पाचवीपासून ते परीक्षेपर्यंत गाईड कॅप्टन जिजा राणे, नितू मालाकर यांनी तयारी करून घेतली. याशिवाय गडचिरोली जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे जिल्हा संघटक गाईड निता आगलावे व जिल्हा संघटक स्काऊट विवेक कहाळे यांचेही योगदान राहिले आहे.

या यशाबद्दल सलोनी करपे हिचे राणी दुर्गावती शाळेचे अध्यक्ष तथा आदिवासी सेवक घनश्याम मडावी, विद्यालयाच्या प्राचार्या वैशाली मडावी, तसेच स्काऊट गाईड प्रमुख कॅ.जिजा राणे, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.

या यशासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा जिल्हा मुख्य स्काऊट आयुक्त विवेक नाकाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा स्काऊट आयुक्त बारेकर, गाईड हेमलता परसा, जिल्हा चिटणीस अमरसिंग गेडाम व जिल्हा सहचिटणीस लता चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.