गडचिरोली : जिल्ह्याच्या ७ तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी संपली आहे. रविवार, दि.५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यात सरपंचपदासाठी ८२ उमेदवार, तर सदस्यपदासाठी ४५२ उमेदवार मिळून ५३४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार अशा अनेक नेतेमंडळींनी गडचिरोलीच्या दुर्गम भागात प्रचारदौरे केल्याने दुर्गम भागातील वातावरण ढवळून निघाले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह लोकसभा-विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्ते जुळवण्यास मदत व्हावी म्हणून नेते मंडळींनी दिवसा, रात्री गावागावात सभा घेऊन नागरिकांना आपल्या कार्यकर्त्यांच्या बाजुने उभे राहण्याचे आवाहन मतदारांना केले.
सार्वत्रिक निवडणुकीसाठी ७ तालुक्यांमध्ये ३७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम लावला होता. त्यापैकी गडचिरोली तालुक्यातील देवापूर ग्रामपंचायतमध्ये सर्व उमेदवार अविरोध निवडल्या गेले, तर १३ ग्रामपंचायतींमध्ये कोणीच उमेदवारी दाखल केली नाही. त्यामुळे २३ ग्रामपंचायतींमध्येच सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्षात मतदान होणार आहे. त्यात कोरची तालुक्यातील ६, धानोरा तालुक्यातील ५, एटापल्ली तालुक्यातील ३, भामरागड तालुक्यातील ६, अहेरी तालुक्यातील २ आणि सिरोंचा तालुक्यातील १ ग्रामपंचायतचा समावेश आहे.
सकाळी ७.३० वाजतापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. मतमोजणी मंगळवार दि.७ रोजी होणार आहे.