गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा, भाडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमध्ये सोमवार, ६ नोव्हेंबरपासून तीन दिवसीय बिटस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. या क्रीडा संमेलनात प्रकल्पातील सुमारे २ हजार ५०० आदिवासी खेळाडू सहभागी होऊन क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन करणार आहेत.
कारवाफा बिटमधील क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या मैदानावर सकाळी १० वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी गडचिरोली प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार राहतील. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उर्मिला सिडाम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले उपस्थित राहणार आहेत.
कारवाफा बिट स्पर्धेत गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय, तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा आठ आश्रमशाळांचा सहभाग राहणार आहे. गडचिरोली प्रकल्पातील पाच बिटमधील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील खेळाडू यात सहभाग घेणार आहेत. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक खेळांसह लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक , धावणे या वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे. क्रीडा संमेलनाच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.