गडचिरोली : गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ म्हणून घोषित करून त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.सोमवारी येथील चांदेकर भवनात झालेल्या पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या संदर्भातील ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, तर केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, विदर्भ उपाध्यक्ष प्रकाश दुधे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, जिल्हा सल्लागार डॉ.हरिदास नंदेश्वर, गडचिरोली विधानसभा प्रमुख प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, जिल्हा संघटक हेमचंद्र सहारे, जिल्हा उपाध्यक्ष तैलेश बांबोडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, महिला प्रमुख नीता सहारे, युवा आघाडीचे प्रमुख नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते विशालसिंग परिहार, विजय देवतळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
देशाच्या राष्ट्रपती, तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती राज्य शासनाच्या इतर मान्यवरांसह बुधवारी गडचिरोलीत येत आहेत. त्यानिमित्ताने हे विद्यापीठ राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ म्हणून घोषित करावे, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.
या बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यात आष्टी-सिरोंचा रस्ता लवकर दुरुस्त करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात आणि लोकशाही प्रक्रिया पूर्ववत व्हावी, ईव्हीएम मशीनवर बंदी घालावी आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात, सर्व स्कूल बसेस सुरू कराव्यात, सर्व रिक्त पदे भरावीत, प्रलंबित वडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग लवकर सुरु करावा , गडचिरोलीची भुयारी गटार योजना पूर्ण करून लवकर सुरू करावी यांचा समावेश होता.
या मागण्या लवकर पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला आहे. बैठकीला हेमाजी सहारे, दादाजी धाकडे, चंद्रभान राऊत, सुदेश झाडे, घनश्याम जक्कुलवार, नरेंद्र उंदीरवाडे, नरेश वाळके, सुखदेव बावणे, डॉ.मनोज आलाम, उमेश ढोक, अरुण भैसारे, रोशन कारंडे, ललिता हर्षे, गीता कोडप, कविता ढोक, सुखदेव मानकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.