ज्येष्ठ पत्रकार पद्मशाली यांच्यावर अभिष्टचिंतनाचा वर्षाव

गडचिरोली : सातत्याने धावपळ आणि ताणतणावाचे जीवन जगणाऱ्या एखाद्या पत्रकाराने विनातक्रार वयाची सत्तरी गाठल्याचे उदाहरण पहायला मिळणे कठीणच. तेसुद्धा वार्धक्याची कोणतीही खुण झळकू न देता किंवा कोणती व्याधी अंगाशी भिडू न देता! पण ज्येष्ठ पत्रकार सुरेश पद्मशाली हे मात्र त्यासाठी अपवाद ठरले आहेत. नुकतीच त्यांनी वयाची सत्तरी पूर्ण केली. यानिमित्त त्यांच्यावर पत्रकारांनी अभिष्टचिंतनाचा वर्षाव केला.

येथील हॅाटेल लँडमार्कमध्ये झालेल्या कौटुंबिक व छोटेखानी कार्यक्रमात गडचिरोली प्रेस क्लबचे सदस्य सहकुटुंब सहभागी झाले होते. यावेळी केक कापून आणि पुष्पगुच्छ देऊन सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

संघर्षपूर्ण आयुष्यात अनेक जडणघडणीचे साक्षीदार असलेले सुरेश पद्मशाली आदिवासी माणूस नावाचे वृत्तपत्र चालवत होते. गडचिरोलीचे प्रेस क्लबचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. आयुष्याच्या उत्तरार्धात हसतखेळत जीवन जगण्यासाठी सर्वांचे प्रेम, आपुलकी हेच माझे उर्जात्रोत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.