सिकलसेलग्रस्त रुग्णांवर गडचिरोलीत होणार मोफत औषधोपचार

अभियानाचा शुभारंभ, लाभ घेण्याचे प्रमोद पिपरे यांचे आवाहन

गडचिरोली : सिकलसेल रुग्णांसाठी शासनाने मोफत औषधोपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. सिकलसेलग्रस्त रुग्णांना उपचार करण्याकरिता सिकलसेल कार्डांचे वाटप करण्यात येत आहे. तसेच रुग्णालयातील सर्व सेवा मोफत देण्यात येणार आहेत. रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा व नागरिकांनीही न घाबरता सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी केले.

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात सिकलसेल निर्मुलन अभियानाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते मार्गदर्शन करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशमधील शहाडोल जिल्ह्यात सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्याच धर्तीवर जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ व सिकलसेल रुग्णांना उपचार करण्यासाठी कार्ड वाटप कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीश सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे, भाजपचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, शिवसेनेचे हेमंत जंबेवार, कविता उरकुडे, ज्योती बागडे, अमिता मडावी, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील मडावी, डॉ.माधुरी किलनाके, डॉ.विनोद म्हशाखेत्री, डॉ.पंकज हेमके, डॉ.दीक्षांत मेश्राम, डॉ.चकोर रोकडे, डॉ.मुकुंद डबाले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ अजय ठाकरे यांनी, तर आभार डॉ.धुर्वे यांनी मानले.