गजबे यांच्या अनपेक्षित पराभवाने हुकली हॅट्रिकचा रेकॅार्ड करण्याची संधी

जनसेवेसाठी तत्पर राहणार – गजबे

आरमोरी : जिल्हयातील तीनही विधानसभा मतदार संघात आतापर्यंत कोणीही सलग तिसऱ्यांदा निवडून आले नाही. पण यावेळी आरमोरी मतदार संघात भाजपचे उमेदवार कृष्णा गजबे हे तिसऱ्यादा निवडून येऊन हॅट्रिक साधतील आणि जिल्ह्याच्या इतिहासात नवीन रेकॅार्ड निर्माण होईल, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र त्यांचा अनपेक्षित पराभव सर्वांसाठीच धक्कादायक ठरला. जनताजनार्दनाने दिलेला कौल स्वीकारत गजबे यांनी आपण ज्या तळमळीने लोकांसाठी कामे केली, तेवढ्याच प्रामाणिकपणे पुढेही काम करत राहीन, असे सांगत जनसेवेसाठी तत्पर राहणार असल्याचे स्पष्ट केले.

वास्तविक भाजपच्या भक्कम पाठबळासोबत गजबे यांची वैयक्तिक प्रतिमाही चांगली होती. सोबतीला सहकार नेते सावकारांचे मार्गदर्शन होते. त्यामुळे गजबे हेच बाजी मारतील असा सर्वसामान्यांचा कयास होता. पण कोरची, कुरखेडा तालुक्यात बसलेला फटका भाजपच्या जिव्हारी लागला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक असलेल्या प्रियंका गांधी यांची झालेली सभा गेमचेंजर ठरली. त्यांनी स्थानिक मुद्द्यांऐवजी केंद्र आणि राज्य सरकारमधील उणीवांवर बोट ठेवत मतदारांचे लक्ष वेधले. त्यामुळे नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा मतांमध्ये परिवर्तित झाल्या नाही.

काँग्रेसचे रामदास मसराम यांनी निवडणूक जिंकल्याने त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षांचे ओझे ते कसे पेलतात याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.