धर्मरावबाबा आत्राम पाचव्यांदा बनणार मंत्री, पालकमंत्रीपद मिळणार का?

आठपैकी पाच निवडणुकांमध्ये विजय

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष आणि अहेरी विधानसभा मतदार संघातील विजयी उमेदवार धर्मरावबाबा आत्राम हे राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे. गेल्या चार दशकांत आत्राम यांनी विधानसभेच्या आठ निवडणुका लढल्या. त्यातील 5 निवडणुका जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक आमदारकीच्या काळात त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. यावेळीही त्यांना मंत्रिपद मिळणे जवळजवळ निश्चित आहे, मात्र गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

चौरंगी लढत आणि अनेक आव्हानांना तोंड देत धर्मरावबाबा आत्राम यांनी अहेरी विधानसभेतील चुरशीचा सामना जिंकला. विशेष म्हणजे 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकल्यापासून प्रत्येक आमदारकीच्या वेळी धर्मरावबाबा यांना राज्यमंत्रीपद मिळाले. अजितदादांसोबत महायुती सरकारमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. आता पाचवी निवडणूक जिंकल्यानंतर यावेळीही त्यांचा मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आहे. मुंबईतील हालचालींमुळे निकालाच्या दुसऱ्याच दिवशी धर्मरावबाबांनी मुंबई गाठली आहे. राष्ट्र्वादीचे पदाधिकारीही मुंबईत डेरा टाकून आहेत. त्यामुळे सर्वांना मंत्रिमंडळाच्या शपथविधीची आणि पहिल्याच यादीत धर्मरावबाबांचे नाव येणार का, याची प्रतीक्षा लागली आहे.

पूर्व विदर्भातील मागास, आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी, जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देऊन रोजगाराचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी, तथा अर्धवट असलेल्या कामांना गती देण्यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांच्यासारख्या अनुभवी व्यक्तिमत्वाला कॅबिनेट मंत्रीपदासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी द्यावी, अशी अपेक्षा जिल्हावासियांकडून केली जात आहे.