गडचिरोली : व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो याचे उदाहरण म्हणजे गडचिरोलीतील भाजपचे उमेदवार डॅा.मिलिंद नरोटे यांचा विजय होय. ‘जिंकण्याची क्षमता केवळ माझ्यातच आहे, त्यामुळे पक्षाचे तिकीट मलाच मिळेल’ असा विश्वास तिकीट वाटपापूर्वी आणि नंतरही डॅा.देवराव होळी यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला होता. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुकीची तयारी केली होती त्यावरून त्यांचा तो विश्वास खरा असेल, असेच वातावरण तयार झाले होते. पण भाजपच्या यंत्रणेने योग्य नियोजन करत नवख्या डॅा.मिलिंद नरोटे यांना निवडून आणून व्यक्तीपेक्षा पक्षाची ताकद मोठी असते हे दाखवून दिले आहे.
सलग दोन वेळा आमदार झाल्यानंतर डॅा.होळी यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला होता. पण अॅन्टी इन्कम्बन्सी आणि समाजातील काही नाराज घटकांमुळे त्यांच्याबद्दल नकारात्मक वातावरण वाढले असल्याचे भाजपच्या लक्षात आले होते. त्यामुळे कोणतीही जोखीम न पत्करता फ्रेश चेहरा देण्यासाठी जेमतेम वर्षभरापूर्वी डॅा.मिलिंद नरोटे यांना राजकारणात सक्रिय केले. पण राजकीय अनुभवाचा अभाव असल्याने काँग्रेसचे अनुभवी उमेदवार मनोहर पोरेटी यांच्यासमोर डॅा.नरोटे कितपत टिकतील अशी चर्चा सुरूवातीला केली जात होती. पण भाजपने योग्य नियोजन केले आणि डॅा.नरोटे यांच्या विजयाचे गणित सोपे होत गेले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाठबळ डॅा.नरोटे यांच्या पाठीशी आधीच होते. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार अशोक नेते यांनी ठिकठिकाणी सभा घेऊन सर्व समाजघटकांमध्ये वातावरण निर्मिती केली. जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, सहकार प्रकोष्ठ आशिष पिपरे यांनी चामोर्शी तालुक्याची धुरा सांभाळत कोणतीही गडबड होऊ दिली नाही. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांनी युवा पदाधिकाऱ्यांना कामी लावले. जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, विधानसभा समन्वयक प्रमोद पिपरे, बाबुराव कोहळे, महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या सूचनेप्रमाणे आपापली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली. त्यामुळे डॅा.नरोटे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.