ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उसळली अफाट गर्दी

सांस्कृतिक मेजवानी, पहा ही व्हिडीओ झलक

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी अहेरीत आयोजित अभिष्टचिंतन सोहळा अभूतपूर्व असा झाला. खमनचेरू मार्गावरील स्नेहा लॉनच्या भव्य मैदानावर आयोजित या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आणि यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.

राजपरिवारातील सदस्यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा केक कापून, लाडूतुला करून हा वाढदिवस सोहळा अविस्मरणीय करण्यात आला. यावेळी सिने अभिनेत्री मुग्धा गोडसे हिची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती ना.धर्मरावबाबा आत्राम, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम (हलगेकर), युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव आत्राम, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, माजी जि.प.सदस्य नाना नाकाडे, सीआरपीएफ 9 बटालियनचे कमांडंट राजेश्वर बाळापुरकर, 37 बटालियनचे कमांडंट मोहनदास खोब्रागडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ना.धर्मरावबाबा यांची लाडूतुला करण्यात आली. तसेच त्यांना गदा भेट देऊन भलामोठा हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पुष्पगुच्छ व फुलांचा खच जमा झाला होता. सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतून चित्रकार सुजल बछार यांनी धर्मरावबाबा यांचे रांगोळीतून रेखाटलेले चित्र आकर्षणाचे केंद्र झाले होते. सोबतच त्यांच्यावरील शॅार्ट फिल्मही यावेळी रिलीज करण्यात आली.

महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ व नृत्याचा नजराणा या कार्यक्रमाने अहेरीकरांना मोठी सांस्कृतिक मेजवानी मिळाली. यावेळी कार्यक्रमाला येणाऱ्या नागरिकांसाठी महाभोजनही ठेवले होते. याशिवाय अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. विविध ठिकाणी इतर सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले.