पोलिस स्मृतिदिनानिमित्त जिल्हाभरात जवानांकडून अशीही ‘रक्तांजली’

रक्तदानासाठी सरसावले तब्बल १०७१ दाते

गडचिरोली : पोलिस दलाच्या वतीने शनिवारी जिल्हाभर पोलिस स्मृती दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त गडचिरोली पोलिस मुख्यालय आणि अहेरीतील प्राणहिता उपमुख्यालयात झालेल्या भव्य रक्तदान शिबिरात तब्बल 1071 बॅग रक्त गोळा झाले. पोलिस अधिकारी आणि जवानांसह काही नागरिकही रक्तदानासाठी सरसावले.

दि.21 ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण भारतात पोलिस स्मृती दिन म्हणून पाळल्या जातो. या दिनानिमित्त पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील शहीद स्मारकाला वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करुन शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. यासोबतच शहीद जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता या दिवसाचे औचित्य साधून पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब नागपूर (साऊथ-ईस्ट) तसेच शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर, आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल, सावंगी मेघे व लाईफलाईन ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पोलिस मुख्यालयातील शहीद पांडू आलाम सभागृहामध्ये तसेच पोलिस उपमुख्यालय प्राणहिता (अहेरी) येथे हे शिबिर झाले.

रक्तदानासाठी गडचिरोली पोलिस दल, सीआरपीएफ, एसआरपीएफचे पोलिस अधिकारी व अंमलदार, तसेच अनेक पोलिस स्टेशन, मदत केंद्रावरून आलेल्या नागरिकांनी आणि शहीद पोलिस जवानांच्या कुटुंबियांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून “रक्तदान हेच श्रेष्ठदान” ही सामाजिक भावना ठेवत रक्तदान केले. यात 1071 बॅग रक्त गोळा झाले.

अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. शिबिरादरम्यान पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी रक्तदानाचे महत्व पटवून देताना, मानवी रक्ताला कुठलाही पर्याय नाही. ज्या समाजात आपण राहतो त्याचे ऋण फेडायची संधी रक्तदानाने आपल्याला मिळत असते. समाजाचा एक जबाबदार घटक या नात्याने यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

या उपक्रमासाठी अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख, गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयुर भुजबळ, कुरखेडाचे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर. तसेच डॉ.राजीव वर्भे, अध्यक्ष रोटरी क्लब नागपूर, डॉ.दिव्या राठोड, आचार्य विनोबा भावे हॉस्पीटल, सावंगी मेघे, डॉ.ओबेद ओमान, शालिनीताई मेघे हॉस्पीटल नागपूर यांनीही सहकार्य केले.

यशस्वीतेकरीता सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी, तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक धनंजय पाटील, सायबर सेलचे उपनिरीक्षक निलेश वाघ, पोलिस कल्याण शाखेचे उपनिरीक्षक नरेन्द्र पिवाल व जनसंपर्क शाखेचे उपनिरीक्षक शिवराज लोखंडे, पोलीस रुग्णालयाची चमू यांनी परिश्रम घेतले.