कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील एका शेतालगतच्या जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर हिंस्र प्राण्याने हल्ला करून तिला ठार केले. सायत्राबाई बोगा (रा.ठुसी) असे मृत महिलेचे नाव आहे. सायत्राबाई आपल्या शेतावर गेली होती. तेथील कामे आटोपल्यानंतर ती शेजारच्या जंगलात सरपण गोळा करत असताना हल्लेखोर वाघवर्गीय प्राण्याने तिला ठार केले.

बराच वेळ झाला तरी सायत्राबाई आली नसल्यामुळे कुटुंबातील सदस्यांसह गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने शोध सुरू केला. तिथे ती मृतावस्थेत आढळली. तिच्या शरीरावर प्राण्याने हल्ला केल्याच्या जखमा होत्या. परंतू हा हल्ला करणारा प्राणी वाघ आहे की बिबट हे स्पष्ट झाले नाही. पायांच्या ठशावरून त्याबाबतचा शोध घेतला जात आहे. दरम्यान त्या भागात बिबट्याचा वावर असल्याने हा हल्ला बिबट्याने केला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
































