गडचिरोली : देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींना डावलने हा महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आदिवासी समाजाचाही अपमान आहे, असे म्हणत आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी शुक्रवारी मुंबईच्या आझाद मैदानात निषेध आंदोलन केले.
राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतात. परंतु संसद भवनासारख्या देशातील प्रमुख वास्तूचे लोकार्पण करताना त्यांना डावलने हा राष्ट्रपती पदाचाच नाहीतर ज्या आदिवासी समाजामधून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आल्या आहेत, त्या आदिवासी समाजाचाही अपमान असल्याचे सांगत शेडमाके यांनी निषेध नोंदविला. 26 मे रोजी निषेध आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी आधीच होता. त्यानुसार आपली भावना त्यांनी राज्याची राजधानी मुंबईत जाऊन व्यक्त केली. या विषयाबद्दल आमच्या आदिवासी जिल्ह्यातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्यासाठी मी मुंबईच्या आझाद मैदानात हे आंदोलन केल्याचे शेडमाके यांनी सांगितले.