लॅायड्स कंपनीच्या खर्चातून होणार येलचिल ते वेलगुरटोला मार्ग पुनर्जिवित

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन

कुदळ मारून रस्त्याच्या कामाची सुरूवात करताना आ.धर्मरावबाबा आत्राम, सोबत उपस्थित इतर मान्यवर

एटापल्ली : सुरजागड लोहखनिज वाहतुकीसाठी महत्वपूर्ण बायपास ठरणाऱ्या येलचिल ते वेलगुरटोला या जुन्या रस्त्याला पुनर्जिवित केले जाणार आहे. या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम लॅायड्स मेटल्स कंपनीच्या खर्चातून केले जाणार आहे. आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते गुरूवारी येलचिल येथे भूमिपूजन करून या कामाची सुरूवात करण्यात आली.

या भूमिपूजनप्रसंगी लॉयड्स मेटल्स व त्रिवेणी कंपनीचे व्यवस्थापक साईकुमार, रस्त्याच्या कामाचे व्यवस्थापक कमल कांत , सरपंच किशोर आत्राम, बलराम सोमनानी, डॉ.चरणजीतसिंग सलुजा, वसंत कुमार, इरफान पठाण, सुरेंद्र अलोणे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सदर रस्ता येलचिल, वेलगुरटोला, आपापल्ली, वडलापेठ, मुत्तापूर, सुभाषनगर येथील मुख्य रस्त्याला जोडणारा आहे.

यावेळी आमदार धर्मरावबाबा म्हणाले, हा रस्ता जुन्या काळातील असून नव्याने बायपास म्हणून पुनर्जिवित होत असल्याने वाहतुकीचा अडथळा दूर होणार आहे. मायनिंग कॅारिडोर तयार होत असल्याने दळणवळणाची समस्या दूर होणार आहे. याबद्दल धर्मरावबाबा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले.