गडचिरोली : आमच्या सरकारच्या काळात नक्षलवाद कमी झाला. जो गडचिरोली जिल्हा नक्षलवादासाठी ओळखला जात होता तो आता विकास आणि स्टिल कंपनीसाठी ओळखला जात आहे. गडचिरोली आता पोलाद सिटी बनत आहे. पक्षाने गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते आणि चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली. त्यांना तुमचे समर्थन म्हणजे मोदींना समर्थन आहे, असे समजून मतदान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी (दि.८) चंद्रपूर येथे झाली. चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरचे उमेदवार अशोक नेते यांच्यासाठी घेण्यात आलेल्या या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह दोन्ही उमेदवार, तथा महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दोन्ही जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांच्या समस्यांचे समाधान करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचे दायित्व असते, पण इथे काँग्रेस स्वत:च समस्यांची जननी आहे, अशी टिका यावेळी पंतप्रधानांनी केली. विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांमध्ये दलित, वंचित, आदिवासीच होते. हे सर्व मी केले नाही तर तुमच्या एका मताच्या ताकदीने केले, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, गुढीपाडव्याच्या पूर्वसंख्येला महायुतीची महाराष्ट्रातील पहिली सभा चंद्रपुरात होत आहे हा शुभसंकेत आहे. मोदीजी एनडीएच्या दिग्विजयाची गुढी उभारतील आणि पंतप्रधान म्हणून हॅटट्रिक देखील करतील, असा विश्वास व्यक्त करत ‘अब की बार चारसौ पार’चा नारा दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही जिल्ह्याच्या उमेदवारांचे काम उत्कृष्ट असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी द्या, असे आवाहन मतदारांना केले.
यावेळी खा.अशोक नेते म्हणाले, आपल्या भागाचं, राज्याचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य बदलविणारी ही निवडणूक आहे. मोदी सरकारने १० वर्षात अगणित योजना आणल्या, अगणित निर्णय घेतले. या देशाला बलशाली करणं, जगात उंच शिखरावर नेणं हे मोदीजींच स्वप्न आहे. तुम्ही मला दोन वेळा संधी दिली. राहिलेली कामे करण्यासाठी पुन्हा संधी द्या, तुमचे ऋण फेडल्याशिवाय राहणार नाही, असे खा.नेते यावेळी म्हणाले.