अहेरी : देशातील नागरिकांना खोटी स्वप्ने दाखवून भुलथापांच्या राजकारणातून भाजपने सत्ता काबीज केली. गेल्या १० वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचे वाटोळे करीत व्यापाऱ्यांचे हित जोपासून भाजपाने संपूर्ण देशाला कर्जबाजारी केले आहे. देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून महिला अत्याचार, बेरोजगारी, गुन्हेगारी यात प्रचंड वाढ झाली आहे. मोदींची वॉरंटी आहे, पण काँग्रेसने मात्र न्यायाची गॅरंटी दिली आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मतदारांना साद घातली.
ना.वडेट्टीवार यांनी सोमवारी एकाच दिवशी मुलचेरा, एटापल्ली आणि अहेरी अशा तीन ठिकाणी प्रचारसभा घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांना कौल देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, शेतमालाला हमीभाव, तरुणांना रोजगार, आदिवासींना जमिनीचा हक्क काँग्रेस मिळवून देईल.
या क्षेत्रातील आदिवासी समाज असो किंवा बंगाली समाज, या प्रत्येक समाजाला काँग्रेसने समान वागणूक दिली. या परिसराततील सुरजागडला ३०० हेक्टर जमीन मिळाली तर चेन्ना प्रकल्पाला का नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. लोकशाही टिकवण्यासाठी ही शेवटची लढाई आहे. देश वाचवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असलं पाहिजे याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
या सभांसाठी प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.नामदेव कीरसान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अतुल गण्यारपवार, अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे नेते रोहिदास राऊत, तथा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.