गडचिरोली : देशात ओबीसींची संख्या अधिक असतानाही जातनिहाय जनगणनेला बगल देऊन सरकार ओबीसींना त्यांच्या मूळ हक्कांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र चालवत आहे. सरकारने ओबीसींच्या संदर्भात जे धोरण राबविले आहे ते प्रचंड धोकादायक आहे. अशा ओबीसीविरोधी प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी संघटित होऊन संघर्षातून धडा शिकवणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात 4 मार्चपासून सुरू असलेल्या ओबीसी युवा समाज संघटनेच्या बेमुदत साखळी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर ते मार्गदर्शन करीत होते.
केंद्र व राज्याच्या विद्यमाने सरकारने बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करावी, मराठा आरक्षण हे ओबीसी प्रवर्गातून देऊ नये, तसेच सरकारकडून सगेसोयऱ्यांबाबत काढलेली अधिसूचना रद्द करावी, नोकर भरती यात ओबीसींना योग्य न्याय द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी ओबीसी युवा समाज संघटनेच्या वतीने हे उपोषण सुरू होते. ना.वडेट्टीवार यांनी उपोषण मंडपाला भेट दिल्यानंतर ओबीसी समाज बांधवांनी आपल्या व्यथा मांडणारे निवेदन ना.वडेट्टीवार यांना दिले.
यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींच्या मागण्यांसाठी आमचा सतत लढा सुरू आहे. आदिवासी किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण 6 टक्केवरून 17 टक्क्यांवर करून दिले होते. मागील पोलिस भरतीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी कमी जागा आरक्षित केल्याने ती भरती थांबवली होती. जर महाविकास आघाडी सरकारला अधिक वेळ मिळाला असता तर ओबीसींच्या अनेक मागण्या पूर्ण झाल्या असत्या असे ते म्हणाले.
सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून बहुजन समाजाच्या युवकांना धर्मांध उन्मादातून दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. या प्रकाराबाबत बहुजन समाजाने जागृत व संघटित होऊन लढा उभारला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी प्रामुख्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सावसाकडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, प्रभाकर वासेकर, युवक काँग्रेसचे विश्वजित कोवासे, प्रा.शेषराव येलेकर, राहुल भांडेकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राकाँ (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेसचाही पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने ओबीसी युवकांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार, प्रदेश सचिव अॅड.संजय ठाकरे, शहराध्यक्ष विजय गोरडवार, जिल्हा सरचिटणीस प्रदीप चुधरी, जिल्हा उपाध्यक्ष नहीम शेख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष शेमदेव चापले, उपाध्यक्ष चंद्रकांत शिवणकर, सुजीत राऊत, छत्रपती टेंबरे, तुलाराम मायकलवार, सुधाकर गद्दे, रमेश भुसारकर, माधव परसोडे, पंकज बारसागडे, खुशाल ठाकरे आदींनी भेट देऊन ओबीसींच्या सर्व मागण्यांना पाठिंबा दिला.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जातनिहाय जनगणना
उपोषणाच्या माध्यमातून ओबीसी युवकांनी मांडलेल्या सर्व मागण्या रास्त आहेत, असे सांगून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषण मंडपाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना, ओबीसीसाठी केंद्रात स्वतंत्र मंत्रालय या प्रमुख मागण्यांसह १० मागण्या समाविष्ट केलेल्या आहेत, असे यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॅा.नामदेव किरसान यांनी सांगितले. पाठिंब्याचे पत्र देताना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष प्रा.शेषराव येलेकर, काँग्रेसचे पदाधिकारी रमेश चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.