गडचिरोली : कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचे आणि काम झाल्यावर तोंड लपवायचे, अशी या शासनाची रीत आहे. मंदिर बांधण्यासाठी आणि कुंभमेळ्याला कोट्यवधी रुपये दिले जातात. मात्र दुर्बल घटकातील कष्टकऱ्यांनी जे काम केले, त्याचा मेहनताना देण्यासाठी पैसे नाही. हे आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे नेते प्रा.रमेशचंद्र दहिवडे यांनी दिला. येथील जिल्हा परिषदेसमोर आयोजित आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाकाळात देशात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. कोणाला कोरोना झाला तर त्याचे कोणीही नातेवाईक पहायला जात नव्हते. कुत्र्यापेक्षा नीच वागणूक दिल्या जात होती. अशा अवस्थेत कोरोना महामारी निर्मूलनासाठी अंगणवाडीच्या महिलांनी मोठे योगदान दिले. त्यांना दरमहा 1000 रुपये कोरोना संपेपर्यंत देण्यात येईल असे सांगून अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा व गटप्रवर्तक तसेच अर्धवेळ स्त्री परिचर यांच्याकडून 24 महीने काम करून घेण्यात आले. आणि केवळ एक हजार रुपये हाती टेकवले. 23 महिन्याचे 23 हजार रुपये थकीत आहे वर्षे लोटूनही ते मिळाले नाही.
थकीत कोरोनाभत्ता तात्काळ द्या, या मागणीला घेऊन जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी अरुण लाटकर नागपूर, अमोल मारकवार, सुनंदा बावणे, अरुण भेलके आदी उपस्थित होते.
मोबदला देण्यात यावा असे चार पत्र मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी काढले. पत्राची अंमलबजावणी करायची नव्हती तर पत्र कशाला काढले, असा सवाल मार्क्सवादी कॅाम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांनी केला. अच्छे दिन केवळ मंदिर, रूढीपरंपरा, ढोंगीबाबांना आले.
अरुण भेलके व अमोल मारकवार यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना भेटले आणि निवेदन सादर केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उज्वला उंदीरवाडे, ललिता केदार, विठाबाई भट, सुमन टोकलवार, रंजना टेंभुर्णे, छाया रामटेके, विठोबा एकोनकर, भारती रामटेके, भागीरथा दूधबावरे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, बेबीताई त्रिनगरीवार, संगीता वडलाकोंडावार यांनी परिश्रम घेतले.
































