गडचिरोली : शहरातील आरमोरी मार्गावरील लक्ष्मीनगर वार्डात महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने बतकम्मा देवीचा उत्सव साजरा केला. या उत्सवाची सांगता स्थानिक कन्यका माता मंदिरात भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
लक्ष्मीनगरात वैशाली पडिशालवार आणि निरजा देसुवार यांच्या पुढाकाराने आयोजित या उत्सवात रंगीबेरंगी फुलांनी बतकम्मा देवीची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली. महिलांनी देवीचे विधिवत पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
बतकम्मा उत्सवातून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच महिलांमधील एकोपा आणि सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्याचा संदेश दिला जातो. उत्सवादरम्यान महिलांनी दक्षिण भारतीय पारंपरिक वेशभूषा परिधान करून दांडिया खेळण्यासह नृत्य व गीतांचे सादरीकरण केले. पारंपरिक गीतांनी आणि देवीच्या जयघोषाने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कन्यका माता मंदिरात देवीचे दर्शन व प्रार्थना करून उत्सवाची सांगता करण्यात आली. मंदिरात महिला व पुरुष एकत्र आले असता संपूर्ण परिसर भक्तीरसात न्हाऊन निघाला. श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा उत्सव महिलांसाठी आनंददायी ठरला.
या उत्सवात लक्ष्मीनगरातील ममता रणदिवे, वैशाली रणदिवे, स्नेहा शेंडे, साची मसराम, प्रभा खोब्रागडे, शोभा चिचघरे, वृषाली पोरेड्डीवार, भावना सूत्रपवार, अर्चना माणुसमारे, कीर्ती गोबाडे, कीर्ती कोतपल्लीवर, रेश्मा एनप्रेडिवार, सोनू गुमडेलवार, प्रशांती पुल्लुरवार, राखी चिलवारवार यांच्यासह शहरातील आर्य वैश्य कोमटी समाजातील अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
































