कोलकातामधील महिला डॉक्टरवरच्या अत्याचाराविरोधात अहेरीत कँडल मार्च

आरोपींना जाहीर फाशी देण्याची मागणी

अहेरी : कोलकाता येथील आर.जी. मेडिकल कॉलेजमध्ये एका डॅाक्टर तरुणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ रविवारी संध्याकाळी अहेरी शहरातून कँडल मार्च काढण्यात आला. त्यानंतर मुख्य चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. त्या डॉक्टर तरुणीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना जाहीर फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

येथील दृष्टी फाउंडेशनच्या अध्यक्ष शाहीन हकीम, डॉ.लुबना हकीम यांच्या नेतृत्वात अहेरी शहरातून कँडर मार्च काढण्यात आला. याप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डॉ.कन्ना मडावी, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, अॅड.पंकज दहागावकर आदींनी डॉक्टर तरुणीला श्रद्धांजली वाहून घडलेल्या निंदनीय घटनेचा तीव्र निषेध केला. आरोपींना लवकरात लवकर आणि फाशीची शिक्षा देण्याची एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

कँडल मार्चमध्ये दृष्टी फाउंडेशन अहेरी, समता सैनिक दल, लक्ष्य अकॅडमी, भगतसिंग फॅन्स क्लब, नगरातील डॉक्टर्स, नर्सेस, महिला भगिनी आणि नागरिक सहभागी झाले होते.