आरमोरी : स्वातंत्र्य दिनी येथील शिवम रेस्टॉरंटमधील युवतीला क्षुल्लक कारणावरून अमानुषपणे बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आ.कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी(दि.19) ठाणेदार विनोद रहांगडाले यांना निवेदन दिले. याशिवाय या घटनेचा निषेध म्हणून मंगळवारी (दि.20) आरमोरी शहरात बंद पाळण्याचा निर्णय घेतला.
रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या युवतीवर हल्ला करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने आरोपीविरोधात वाढीव कलम लावण्याची मागणी करण्यात आली. आरोपींचे इतर साथीदार मोकळे असल्याने त्या युवतीला पोलीस सुरक्षा पुरविण्यात यावी. तसेच आरमोरी शहरात भविष्यात असा प्रकार करण्याची हिंमत कोणी करणार नाही यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करावी, आदी मागण्यांची निवेदन ठाणेदारांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आ.कृष्णा गजबे यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री सदानंद कुथे, जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे, माजी न.प.आरोग्य सभापती भारत बावनथडे, शहर तालुकाध्यक्ष विलास पारधी, नितीन जोध, विश्व हिंदू परिषदेचे शंकर बोरकर, बजरंग दलाचे अमन गायकवाड, शुभम निंबेकर, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख अर्चना गोंदोळे, नारायण धकाते, संतोष गोंडोळे, राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर, काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय सुपारे, सुधीर सपाटे, कुणाल पिल्लारे, राहुल तितीरमारे, सुरज कारकुरवार, अमनसिंग गहीरवार, लकी सोनेकर, शुभम चिचघरे, पवन कुकड्का, रमेश निंबेकर, चंद्रशेखर चिजघरे, धीरज बोधलकार, निहाल बोधलकर, पियुष सोनटक्के, कुणाल पिलारे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
आज आरमोरी राहणार कडकडीत बंद
शिवम रेस्टॉरंटमधील युवतीला मारहाण करणाऱ्या आणि त्याला प्रोत्साहन देणाऱ्या इतर समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तथा या घटनेचा निषेध करण्यासाठी आज, दिनांक 20 ऑगस्ट रोजी आरमोरी शहरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन सर्वपक्षीयांनी केले आहे. आरमोरी शहरातील सर्व दुकाने, बाजारपेठ, शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. फक्त अत्यावर सेवा उपलब्ध राहणार आहेत. या बंदला भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट), बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, बंगाली आघाडी, विविध महिला संघटना, गायत्री परिवार, पतंजली योग समिती, तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपले समर्थन दिले आहे.