गडचिरोली : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून प्रोजेक्ट उडान राबविला जात आहे. त्याअंतर्गत गुरूवारी दि.२२ ला रोजगार मेळावा घेण्यात आला. त्यात नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ३५ युवतींना पुणे व हैदराबाद येथे नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस दल व पार्कसन्स स्किल सेंटर नागपूर, तसेच मेहमुदा शिक्षण बहुद्देशीय संस्था नागपूर व एसआयएस चंद्रपूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन पोलीस मुख्यालय परिसरातील एकलव्य हॉल मध्ये केले होते.
या मेळाव्यात दुर्गम-अतिदुर्गम भागातील 200 बेरोजगार युवक-युवती नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित उमेदवारांमधून पार्कसन्स स्किल सेंटर नागपूर यांच्यामार्फत हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग असिस्टंट व सुरक्षा रक्षक म्हणून उमेदवारांना रोजगाराची संधी दिली जाणार आहे. तसेच नर्सिंग असिस्टंट प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 35 युवतींना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता म्हणाले, पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करुन देण्यात येतात. त्याचा सर्वांनी फायदा करुन घ्यावा. आपले व आपल्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, मेहनत करुन जास्तीत जास्त यशस्वी व्हावे. गडचिरोली पोलीस दल नेहमीच तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास उपस्थित युवक-युवतींना दिला.
यावेळी पार्कसन्स स्किलचे मोबलायझेशन अॅन्ड प्लेसमेंट हेड हेमंत बन्सोड, संस्था प्रमुख तुषार मेश्राम, मेहमुदा शिक्षण संस्थेचे मुकेश पाटणे प्रामुख्याने उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्टेशन व मदत केंद्रांचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी धनंजय पाटील व अंमलदार यांनी परिश्रम घेतले.