बीआरएसच्या एंट्रीने दक्षिण गडचिरोलीत राजकीय उलथापालथीला सुरूवात

आविसंचे रवी सुलतान राष्ट्रवादीच्या तंबूत

रवी सुलतान यांचे स्वागत करताना आ.धर्मरावबाबा आत्राम

सिरोंचा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने जिल्ह्यात एंट्री केल्यानंतर दक्षिण गडचिरोलीत राजकीय उलथापालथीला सुरूवात झाली आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांचे खंदे समर्थक असलेले आदिवासी विद्यार्थी संघाचे शहर अध्यक्ष रवी सुलतान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत मोठा धक्का दिला आहे.

माजी आमदार दीपक आत्राम यांच्या बीआरएसमधील प्रवेशानंतर आदिवासी विद्यार्थी संघ दीपकदादा आणि माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्यात विभागल्या गेली. नेता म्हणून दीपकदादांचे नेतृत्व स्वीकारायचे, की आदिवासी विद्यार्थी संघाला वाढविण्यात योगदान देणाऱ्या अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात काम करायचे अशी द्विधा मनस्थिती अनेक पदाधिकाऱ्यांची झाली आहे. या अंतर्गत वादाला कंटाळून रवी सुलतान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्याचे बोलले जाते.

रवी सुलतान हे माजी आमदार दीपक आत्राम यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते आदिवासी विद्यार्थी संघटनेत काम करत असून सिरोंचा भागात त्यांची पकड आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आदिवासी विद्यार्थी संघटनेची एकहाती सत्ता बसविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांच्यात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू होती. सुलतान यांच्या नवीन घरोब्याने या वादाला पूर्णविराम मिळाला.

आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन रवी सुलतान यांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, रवी रालाबंडीवार, एम डी शानू, मदनय्या मानदेशी, श्रीनिवास गोदारी आदी उपस्थित होते.