गडचिरोली : दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी आलापल्ली येथे आलेल्या एटापल्ली तालुक्यातील एका अल्पवयीन आदिवासी मुलीला रात्रभर आलापल्लीत ठेवून तिला जबरीने दारू पाजत दोन जणांनी तिचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी त्या दोघांनाही अटक करण्यात आली असून दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती अहेरीचे पोलीस निरीक्षक किशोर मनभाव यांनी दिली.

या प्रकरणात आरोपी रोशन गोडसेलवार (२३) रा.आलापल्ली आणि निहाल कुंभारे (२४) रा.जीवनगट्टा या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. आरोपी एका संघटनेशी संबंधित असल्यामुळे आणि अल्पवयीन आदिवासी युवतीशी अशा पद्धतीने सामुहिक अत्याचार करण्याच्या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दि.१० ला रात्रभर आरोपींनी लैंगिक शोषण केल्यानंतर दि.११ च्या पहाटे त्या पीडित मुलीला आलापल्लीतील चौकात सोडून दिले. मुलीने आरडाओरड करत आपबिती सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिने आपले घर गाठत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तिला घेऊन एटापल्ली पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. एटापल्ली पोलिसांनी हे प्रकरण अहेरीकडे वर्ग केले.
आरोपींवर कठोर कारवाई करा- शेकाप
दरम्यान एका आदिवासी मुलीच्या शोषणाचा हा प्रकार निषेधार्ह असून यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या जयश्री वेळदा यांनी पोलीस अधीक्षकांकडे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. आरोपीवर बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॅासिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.
































