देसाईगंज : एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन शिक्षकांसह आणखी एका आरोपीला १५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान त्या दोन शिक्षकांवर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नसली तरी कायदेशिर प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना निलंबित केले जाईल, अशी माहिती सुत्रांनी दिली.
तुळशी येथील रहिवासी आणि गडचिरोली न्यायालयात कारकून असलेला अक्षय रामटेके, तसेच देसाईगंजच्या पार्वतीबाई मतिमंद विद्यालयात शिक्षक असलेला पवन रामटेके आणि देसाईगंजमधील रहिवासी, परंतू गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक असलेल्या भूपेश कनोजिया अशा तिघांवर एका अल्पवयीन मुलाचे लैगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली देसाईगंज पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिघांनाही अटक झाली असून दि.१५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. तिघेही सरकारी नोकरीवर आहेत. नियमानुसार ४८ तास अटकेत असल्यास नोकरीतून निलंबित केले जाते. त्यामुळे त्या दोन शिक्षकांसह तिसऱ्याही आरोपीला नोकरी गमवावी लागणार आहे.
































