मेडीगड्डाच्या नुकसानग्रस्तांना अखेर गुरूवारी मिळणार मदतीचे धनादेश

खासदार अशोक नेते यांचा पुढाकार, ३७ कोटींचे होणार वाटप

गडचिरोली : तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर बनविलेल्या मेडीगड्डा बॅरेजच्या बॅकवॅाटर आणि ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे आणि पिकांचे नुकसान झाले, त्यांना ३७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. गुरूवार, दि.१५ जून रोजी सिरोंचा येथील तहसील कार्यालयात धनादेश वाटपाचा कार्यक्रम खासदार अशोक नेते व इतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य आ.रामदास आंबटकर, आ.धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात मेडीगड्डा बॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाल्याने नदीचे तुंबलेले पाणी (बॅकवॅाटर) लगतच्या अनेक शेतांमध्ये शिरले होते. तसेच ओव्हरफ्लोचे पाणी अंकिसा आणि परिसरातील गावे आणि शेतांमध्ये शिरून पिकांसह अनेक शेतकऱ्यांची शेतजमिनही खरडून गेली. या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ४२ दिवस साखळी उपोषण केले. यादरम्यान खासदार अशोक नेते यांनी त्या उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करत नुकसानभरपाईसाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुरध्वनीव्दारे माहिती दिली होतीत. त्या अनुषंगाने सरकारकडे पाठपुरावा सुरू असून मदत नक्की मिळेल, असे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले होते. त्यानंतर शोभाताई फडणविस यांनीही प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन लवकरच मदत मिळेल असे सांगत त्यांचे उपोषण सोडविले. अखेर महाराष्ट्रासोबत तेलंगणा सरकारनेही नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले आहे.

१२८ हेक्टरवरील पीक आणि शेतजमीन खरडून गेल्यामुळे एकूण ३७ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्यातील ११ कोटी तेलंगणा सरकार देणार असून २६ कोटीची भरपाई महाराष्ट्र सरकार देणार आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या नावे धनादेश बनविण्याचे काम सुरू आहे. येत्या १५ जून रोजी सिरोंचा तहसील कार्यालयात सर्वांना धनादेशाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्व संबंधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांच्याकडून करण्यात आले.