गडचिरोली : धानोरा तालुक्यातील चातगावचे रहिवासी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अजिज उर्फ राजू जीवाणी यांनी डॅा.साळवे नर्सिंग कॅालेजचे संचालक डॅा.प्रमोद साळवे यांना अपमानजनक बोलून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली जीवाणींवर गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय नर्सिंग कॅालेजच्या विद्यार्थिनी तिथे असताना सार्वजनिक ठिकाणी अपमानजनक हातवारे केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार गेल्या महिन्यात 8 मार्च रोजी दुपारी घडला. याप्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी आता राजू जीवाणी याच्यावर गुन्हा दाखल केला.
डॅा.साळवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 8 मार्च रोजी दुपारी ते चातगाव येथील नर्सिंग कॅालेजसमोरील आपल्या निवासस्थानातून नागपूरला जाण्यासाठी निघत असताना त्यांना निवासस्थानासमोर काही वाहने उभी केलेली आढळली. त्याचवेळी चातगाव येथील किराणा व्यावसायिक आणि माजी जि.प.सदस्य राजू जीवाणी यांनी तिथे येऊन जुन्या प्रकरणावरून वाद उकरून काढला आणि डॅा.साळवे यांना शिवीगाळ केली.
डॅा.साळवे यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात ‘मोघल’ म्हणून कोणाला संबोधले, शिवाय कॅालेजच्या स्नेहसंमेलनातील आपल्या भाषणात सुगंधित तंबाखूचा विषय कशासाठी काढला, असे धमकावणीच्या सुरात डॅा.साळवे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर डॅा.साळवे यांनी व्यवस्थित बोल, इथे मुली आहेत, असे म्हटल्यानंतर जीवाणी यांनी मुलींकडे पाहून वेगवेगळे हातवारे केल्याने मुलींचाही अपमान केला. एवढेच नाही तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे डॅा.साळवे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान पोलिसांनी सुरूवातीला हे प्रकरण चौकशीत ठेवले. त्यानंतर शहानिशा करून राजू उर्फ अजिज अहमदभाई जीवाणी यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
या सर्व प्रकारामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण झाला असून या षडयंत्राच्या मुळाशी कोण-कोण आहेत, याची सखोल चौकशी करून संबंधितांना अटक करावी, अशी मागणी डॅा.साळवे यांनी केली आहे.