आरमोरी : येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रसुतीसाठी दाखल झालेल्या चार गर्भवती महिलांना सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी तब्बल 18 तास प्रतीक्षा करावी लागली. शेवटी गडचिरोली आणि धानोरा येथून डॅाक्टरांना पाचारण करून त्यांच्या सिझर प्रसुती करण्यात आल्या. आता बाळ आणि बाळंतीण सुखरूप आहेत.
प्राप्त माहितीनुसार, प्रियंका मडावी (जोगीसाखरा), रामिका मडावी (विहीरगाव), दीपाली वाटगुरे (कोकडी), प्रणाली कांबळे (आरमोरी) यांच्यासह इतर गर्भवती महिला प्रसुतीसाठी आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे सांगण्यात आले होते. मात्र, आवश्यक वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या. त्यामुळे गर्भवती महिला व त्यांच्या नातेवाइकांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांना रात्रीपासून अन्न-पाण्याविना राहावे लागल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.
या प्रकाराची माहिती रुग्णांचे नातेवाईक चेतन मडावी यांनी सामाजिक कार्यकर्ते दिलीप घोडाम यांना दिली. त्यामुळे घोडाम यांनी लगेच आरमोरी उपजिल्हा रुग्णालय गाठून माहिती घेतली. वैद्यकीय अधिकारी बन्सोड यांनी डॉक्टर उपलब्ध नाही, ते येत असल्याने वेळ लागत असल्याचे सांगितले. पण आवश्यक डॉक्टर उपलब्ध नसतील, तर गर्भवती महिलांना गडचिरोली येथे रेफर का केले नाही, असे घोडाम यांनी विचारले असता डॅा.बन्सोड यांनी वरिष्ठांशी बोलण्याचा सल्ला दिला.
रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.राजकुमार कोरोटी हे रजेवर होते. तरीही घोडाम यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी तातडीने दखल घेत गडचिरोली येथून डॉ.आत्राम आणि धानोरा येथून डॉ.दुधे या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आरमोरी येथे पाचारण केले. अखेर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास चारही गर्भवती महिलांच्या सिझेरियन शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. सर्व माता आणि नवजात बालके सुखरूप आहेत.
वेळेवर हस्तक्षेप आणि पाठपुराव्यामुळे शस्त्रक्रिया पार पडल्याची भावना नातेवाइकांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रसुतीसारख्या संवेदनशील बाबतीत आवश्यक तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसणे ही गंभीर बाब आहे. सकाळी 10 वाजता शस्त्रक्रिया होणार असल्याचे सांगूनही डॉक्टरांची व्यवस्था वेळेत का झाली नाही? पर्यायी वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्यवस्था का करण्यात आली नव्हती? गर्भवती महिलांना तब्बल 18 तास प्रतीक्षा का करावी लागली? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेची जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी, आणि आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात 24 तास आवश्यक ते डॅाक्टर्स उपलब्ध राहतील अशी व्यवस्था करण्याची मागणी दिलीप घोडाम, वृंदा मडावी व चेतन मडावी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवी गावंडे यांच्याकडे केली आहे.
































