Home पब्लिक प्रॉब्लेम दुबईत अडकलेले बुरेवार कुटुंबिय भारतात सुखरूप परतले

दुबईत अडकलेले बुरेवार कुटुंबिय भारतात सुखरूप परतले

दुबईत माजी विद्यार्थ्यांची भेट

दुबईत बुरेवार कुटुंबियांसह भेट घेणारे विलास चांदेकर.

गडचिरोली : आखाती देशांतील तणावामुळे दुबईत अडकलेल्या गडचिरोलीतील बुरेवार कुटुंब अखेर गुरूवारी सकाळी भारतात दाखल झाले. आज हे कुटुंबिय गडचिरोलीत पोहोचतील. विशेष म्हणजे तणावाच्या परिस्थितीत त्यांना दिलासा देण्यासाठी दुबईत वास्तव्यास असलेले गडचिरोलीतील विलास चांदेकर यांनीही भेट घेऊन त्यांना आवश्यक ती मदत केली.

‘हॉटेल रसिका’चे संचालक सुनील बुरेवार हे कुटुंबासह पर्यटनासाठी दुबईला गेले होते. आखाती देशात युद्धजन्य स्थिती निर्माण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे ते तिथेच अडकले होते. मायदेशी सुरक्षित परतण्यासाठी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे मदतीची विनंती केली होती. ही माहिती समाजमाध्यमांद्वारे गडचिरोलीत पसरल्यानंतर उदय धकाते यांनी मागील 20 वर्षांपासून दुबईत वास्तव्यास असलेले विलास चांदेकर यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती त्यांना दिली. चांदेकर यांनी प्रयत्नपूर्वक बुरेवार कुटुंबाशी संपर्क साधला.

माजी विद्यार्थ्यांची दुबईत भेट

धकाते यांच्या विनंतीनुसार विलास चांदेकर यांनी संबंधित हॉटेलमध्ये जाऊन सुनील बुरेवार व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी त्यांना मानसिक आधार देत आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी गडचिरोलीतील सर्वात जुन्या असलेल्या जिल्हा परिषद शासकीय हायस्कूलच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन उदय धकाते यांनी केले होते. त्या कार्यक्रमात देश-विदेशातून सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्याच ओळखीतून विलास चांदेकर यांच्याशी संपर्क प्रस्थापित झाला होता. विशेष म्हणजे बुरेवार आणि चांदेकर हे दोघेही त्याच शाळेचे माजी विद्यार्थी असून, दुबईतील या भेटीत ते एकाच गावातील व शेजारी असल्याचेही उघड झाले. दुबईत अडकलेल्या बुरेवार कुटुंबाला वेळेवर मदतीचा हात मिळाल्याने त्यांच्या नातेवाईक तसेच मित्रपरिवारांनी समाधान व्यक्त केले.