आरमोरी : आरमोरी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, नगरसेवक व स्वीकृत सदस्यांचा ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते सत्कार गुरूवारी समारंभाचे आयोजन केले होते. उत्साहपूर्ण वातावरणात झालेल्या या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अरविंद सावकार यांनी महायुती सरकारच्या सहकार्याने आरमोरीला समृद्धीचे नवे क्षितिज उपलब्ध करण्याचे आवाहन नवीन पदाधिकाऱ्यांना उद्देशून केले.
याप्रसंगी सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आ.कृष्णा गजबे, डॉ.दुर्वेश भोयर, ईश्वर पासेवार, व्यंकटेश नागीलवार, वसंत मेश्राम, अनंत साळवे, डॉ.लाकडे, विलास पारधी, श्रीहरी कोपुलवार, खेमराज डोंगरवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.
स्वर्गीय नामदेवराव सावकार पोरेड्डीवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अरविंद सावकार व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी पुतळ्याचे पूजन केले. यावेळी नगराध्यक्ष रुपेश पुणेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांना शाल-श्रीफळाने सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अरविंद सावकार पोरेड्डीवार म्हणाले, “आरमोरीचा विकास हाच आपला सामूहिक संकल्प आहे. नवनिर्वाचितांनी पायाभूत सुविधा, सहकार, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवावेत. स्वर्गीय नामदेवरावांच्या आदर्शांना अनुसरून जनतेच्या प्रत्येक अपेक्षेला उत्तर द्या. महायुती सरकारच्या सहकार्याने आरमोरीला समृद्ध करा” असे आवाहन त्यांनी केले.
माजी आमदार कृष्णा गजबे म्हणाले, “निवडणुकीतील विजय ही जबाबदारी आहे. नगर परिषद सदस्यांनी विकासाच्या प्रत्येक आघाडीवर अथक मेहनत घ्यावी. मी कार्यकर्त्याच्या भूमिकेत नेहमी जनसेवेसाठी तत्पर राहीन. आरमोरीच्या गावागावापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी सर्वजण एकजूट व्हा!
सत्कारानंतर विकासाच्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. या कार्यक्रमाने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांमध्ये विकासाची नवी उमेद निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे संचालन पंकज खरवडे यांनी केले.
































