Home पब्लिक प्रॉब्लेम मुलांनो, आता नक्षलवाद्यांची भिती नको, आम्ही आहोत ना !

मुलांनो, आता नक्षलवाद्यांची भिती नको, आम्ही आहोत ना !

दुर्गम भागात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

आरोग्य तपासणीसाठी उसळलेली नागरिकांची गर्दी

गडचिरोली : ‘अनेक वर्षांपासून तुमचे कुटुंब नक्षलवाद्यांच्या दहशतीत वावरत होते. त्यांचे ऐकले नाही तर ते क्रुरपणे मारून टाकायचे. त्यांच्यामुळे तुमच्या गावांचा विकास झाला नाही. पण आता चिंता करायची नाही, आम्ही तुमच्या सोबत आहोत,’ असा दिलासा देत पोलीस विभागाकडून दुर्गम-अतिदुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. नव्याने पोलीस मदत केंद्राची उभारणी केलेल्या नेलगुंडासह अनेक ठिकाणी फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ही जनजागृती आणि सोबत नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.

नेलगुंडा येथे नुकत्याच झालेल्या शिबिरात अतिदुर्गम गोंगवाडा, भटपार, मिळदापल्ली, नेलगुंडा गावातील नागरिकांनी वैद्यकीय तपासणीचा लाभ घेतला. पोलीस रुग्णालय गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या आरोग्य शिबिरादरम्यान फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहीद जवानांचे बलिदान व पोलीस दलाच्या कार्याबद्दल बालके आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.

अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात आहेत. त्याअंतर्गत दोन दिवसांपूर्वी नेलगुंडा येथील आठवडी बाजार परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये महिला व बाल रुग्णालयाचे डॉ.प्रशांत पेंदाम (बालरोगतज्ज्ञ), पोलीस रुग्णालय गडचिरोलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी, डॉ.रोशन गिरसावळे, शैलेश मानमोडे (फार्मसिस्ट), तसेच 113 बटा. सीआरपीएफचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अशोक नारायण, तुकाराम महाडीक (फार्मसिस्ट) यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

सदर मेळाव्यादरम्यान आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देऊन विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 11 नागरिकांना आवश्यकतेनुसार विविध रुग्णालयांच्या ठिकाणी पुढील तपासणीसाठी शिफारस करण्यात आली. तसेच बालरोग तज्ज्ञांकडून शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.