Home क्राईम बिबट्याच्या बछड्याची शिकार करणाऱ्या तिघांना 3 वर्षांची शिक्षा

बिबट्याच्या बछड्याची शिकार करणाऱ्या तिघांना 3 वर्षांची शिक्षा

कुरखेडा न्यायालयाचा निकाल

कुरखेडा : तालुक्यातील दादापूर राखीव वनक्षेत्रात 2014 मध्ये बिबट्याच्या पिल्लाची शिकार करून त्याची कातडी व नखे विक्रीसाठी नेणाऱ्या तिघांना येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एन.पी. देशपांडे यांनी दोषी ठरवत वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत तीन वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली.

प्रकरण काय आहे?

10 ऑक्टोबर 2014 रोजी नागपूर येथील गोंडवाना चौकात क्राईम ब्रँचचे एपीआय जी.डी. कुंभारे यांनी आरोपी मोरेश्वर चरणदास अंबाडे याच्या ताब्यातून बिबट्याच्या पिल्लाची कातडी व पाच नखे जप्त केली होती. चौकशीत आरोपी नलिन काशिनाथ अंबाडे याने ही कातडी आरोपी नं.3 परशराम झिटारू नरोटे याच्याकडून घेतल्याचे उघड झाले. परशराम नरोटे याने दादापूर वनक्षेत्रातील कंपार्टमेंट क्र.245 मध्ये कुत्र्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याच्या पिलाला कुऱ्हाडीने मारून त्याची कातडी काढली होती. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाने गुन्हा दाखल केला. सहाय्यक वनसंरक्षक प्रितमसिंग कोडापे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

तीनही आरोपींना दंडासह सजा

न्यायालयाने सर्व पुरावे, जप्त कातडी-नखे, कागदपत्रे, जागेचे पंचनामे विचारात घेत आरोपींना दोषी ठरवले. यात आरोपी नं.3 परशराम नरोटे याला 6 महिने सक्तमजुरी आणि 500 रुपये दंड, तसेच सर्व तीनही आरोपींना वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या कलम 51 अंतर्गत 36 महिने (तीन वर्षे) सक्तमजुरी व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 4 महिने सक्तमजुरी करावी लागणार आहे. कातडी व नखे शासनाच्या ताब्यात देण्यात येणार असून, कुऱ्हाड व दुचाकी जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणात सरकारच्या वतीने अॅड.अविनाश नाकाडे यांनी बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने अॅड.गोकुल नागमोती यांनी युक्तिवाद केला.