गडचिरोली : पशुंनाही लाजवेल असे कृत्य दोन वासनांध भावंडांनी कुरखेडा तालुक्यातील एका छोट्या गावात केले आहे. त्यांनी एका सात महिन्यांच्या गर्भवती महिलेवर तिच्या घरात शिरून अमानुषपणे बलात्कार केला. या संतापजनक घटनेतील दोन्ही आरोपींना कुरखेडा पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांचा पीसीआर दिला आहे.
ताराचंद कपुरडेरिया आणि संजय कपूरडेरिया अशी या घटनेतील आरोपींची नावे आहेत. कुरखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुरखेडापासून जवळच असलेल्या एका छोट्या गावात गुरूवारच्या रात्री ही घटना घडली. पीडित महिला सात महिन्यांची गर्भवती आहे. ती बाळंतपणासाठी माहेरी आल्याचे समजते. तिचे हे दुसरे बाळंतपण आहे.
दरम्यान गुरूवारी रात्री ती घरात एकटीच असल्याने कपूरडेरिया भावंडांची वासनांध नजर तिच्यावर पडली. त्यांनी संधीचा फायदा घेत आपले काम साधले. त्या असहाय महिलेने आपबिती सांगितल्यानंतर तिला कुरखेडा येथे नंतर गडचिरोली येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
कुरखेडा पोलिसांनी दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांचा पीसीआर दिला. या घटनेचा तपास ठाणेदार संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे करीत आहे.