गडचिरोलीतील रानभाजी महोत्सवात आल्या आजार पळविणाऱ्या भाज्या

काय सांगतात सहभागी महिला, एेका त्यांच्याच तोंडून

गडचिरोली : दैनंदिन आहारात आपण खात असलेल्या भाज्या पिकवण्यासाठी किटकनाशकांची फवारणी आणि रासायनिक खतांचा वापर केलेला असतो. पण गडचिरोली जिल्ह्यात खतांचा वापर किंवा फवारणी न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या रानभाज्या मिळतात. शेतालगत आणि जंगलात मिळणाऱ्या या भाज्यांची ओळख आणि त्याचे महत्व कळण्यासाठी गडचिरोलीत दरवर्षी रानभाजी महोत्सव आयोजित केला जातो. शुक्रवार दि.११ आॅगस्ट रोजी यावर्षीचा रानभाजी महोत्सव झाला.

राज्यात सर्वाधिक वनक्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात नैसर्गिकरित्या अनेक रानभाज्या उगवत असतात. पण त्या भाज्यांची ओळख किंवा त्याचे महत्व शहरी भागातील नागरिकांना माहीत नसते. त्यामुळे कृषी विभागाच्या वतीने दरवर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, अर्थात ‘आत्मा’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या यावर्षीच्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन वाढविण्यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले. या प्रदर्शनात अनेक भाज्याचे स्टॅाल लागले होते. विशेष म्हणजे यातील मोजक्याच भाज्यांची ओळख शहरी भागातील लोकांना असल्याने अनेक जण उत्सुकतेपोटी या प्रदर्शनाला भेट देऊन माहिती जाणून घेत होते.

शेतकऱ्यांसोबत बचत गटाच्या महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टाॅल या प्रदर्शनात मांडले होते. या भाज्यांमधील गुणधर्म अनेक प्रकारचे आजार दूर करण्यासाठी प्रभावशाली असल्याचे त्यांनी सांगितले. या रानभाज्या शेतात उगविल्या जात नसल्या तरीही त्या संकलित करून बऱ्याच महिलांना थोडीफार का होईना मिळकत होते. या भाज्यांचे योग्य पद्धतीने मार्केटिंग झाल्यास त्या महिलांना भाज्यांचा आणखी जास्त मोबदला मिळू शकतो.