Home दैनंदिन बातम्या जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाची सायकल रॅली

जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाची सायकल रॅली

पोलीस अधीक्षक, सीईओ सहभागी

गडचिरोली : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर करावा, हा संदेश देण्यासाठी जागतिक सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. पोलीस अधीक्षक एम.रमेश, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यात सहभागी झाले होते.

संयुक्त राष्ट्रसंघाने 2018 पासून 3 जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून घोषित केला आहे. सायकल ही स्वस्त, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल असे शाश्वत वाहतुकीचे प्रभावी साधन असून नेहमीच सायकल चालविल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

3 जून रोजी सकाळी 7 वाजता पोलीस कवायत मैदान गडचिरोली ते इंदिरा गांधी चौकपर्यंत सायकल रॅलीचे आयोजन केले होते. आरोग्य व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 150 हून अधिक पोलीस अधिकारी तथा अंमलदार, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सायकल रॅलीचा समारोप शहिद पांडू आलाम सभागृह येथे करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमादरम्यान सहभागींना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले. नियमित सायकल चालविल्यामुळे आरोग्य सुधारण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनालाही मोठी मदत होते. बदलत्या परिस्थितीनुसार आणि शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण सर्वांनी किमान एक दिवस सायकलचा वापर करावा. यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढण्यास, मानसिक आरोग्य सुधारण्यास, तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास प्रोत्साहन मिळेल, असे आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी केले.

याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) हर्षवर्धन बी.जे., तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे, विशेष अभियान पथक व सर्व शाखांचे अधिकारी तथा अंमलदार उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे पोउपनि. चंद्रकांत शेळके व अंमलदार तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदारांनी परिश्रम घेतले.

सायकल स्नेही मंडळाचा उपक्रम

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल स्नेही मंडळ गडचिरोली यांच्या वतीने बुधवारी शहरात सायकल रॅलीचे आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि आरोग्यदायी जीवनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

गेल्या सात वर्षांपासून सायकल स्नेही मंडळ गडचिरोली जिल्ह्यात “सायकल चालवा, पर्यावरण वाचवा आणि आरोग्यवान बना” हा संदेश रुजविण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षीही जागतिक सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.