Home पब्लिक प्रॉब्लेम जमिनी वाचविण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

जमिनी वाचविण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

मोठ्या संख्येने शेतकरी येणार

ठिय्या आंदोलनाला जाण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाड्या ग्रिन नेट लावून अशा सज्ज केल्या आहेत.

गडचिरोली : प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आज 4 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने शेतकरी जमून ठिय्या आंदोलन करणार आहेत. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामीण भागातून गडचिरोलीकडे येण्यासाठी दोन दिवसांपासून शेतकरी आपल्या बैलगाड्या सज्ज ठेवून आहेत.

गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी, आणि शिरपूरचक येथे प्रस्तावित विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तसेच चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसीकरीता भेंडाळा परिसरातील 14 गावांनीही शेतजमिनी देण्यास नकार दिला आहे. याशिवाय चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर परिसरातील आणखी 13 गावांच्या जमिनींचे अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या धोरणाच्या निषेधार्थ यापूर्वी जीआरची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच निवेदन देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शासन शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांनी या ठिय्या आंदोलनाची तयारी केली आहे.

तसेच, गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्ह्यात रानटी हत्तींचा मोठ्या प्रमाणात उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हत्तींच्या बंदोबस्तासाठी वारंवार मागणी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेल्या नाही, त्यांचा तातडीने व कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.

या सर्व मागण्यांसाठी आणि जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवून पर्यायी जागांचा वापर करण्यात यावा, या मागणीसाठी 4 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात शेतकरी बांधव, नागरिक, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले आहे.

ठिय्या आंदोलनाला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा

चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांची सुपीक जमीन एमआयडीसीसाठी, तसेच गडचिरोली तालुक्यातील हिरापूर-गुरवळा परिसरातील जमीन विमानतळ प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना भूमिहीन करणारे हे जमीन अधिग्रहण तात्काळ रद्द करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी आयोजित ठिय्या आंदोलनाला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी हितचिंतक व नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केले आहे.

ॲड.कोवासे म्हणाले की, राज्यातील महायुती सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असून सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमिनी बळजबरीने अधिग्रहित केल्या जात आहेत. अशा अन्यायकारक निर्णयांविरोधात काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आहे आणि पुढेही राहील. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला बळ देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या लढ्याला ताकद द्यावी, असेही आवाहन त्यांनी केले.