गडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह, उत्पादक गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंघ बाजारपेठीय ओळख मिळावी यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ‘गडचिरोली ब्रँड’ विकसित केला जात आहे. त्यासाठी लोगो आणि टॅगलाईन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून निवडण्यात येणारा लोगो आणि टॅगलाईन भविष्यात उमेद अंतर्गत उत्पादित वस्तूंच्या ब्रँडिंगसाठी वापरण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी उमेद अभियानांतर्गत विविध स्वयंसहाय्यता समूह, उत्पादक गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. या समूहांमार्फत कृषी, प्रक्रिया उद्योग, हस्तकला, वनाधारित उत्पादने तसेच इतर विविध दर्जेदार वस्तूंचे उत्पादन केले जाते. या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व उत्पादने एकाच ब्रँड नावाखाली विक्री करण्याचा मानस जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर आकर्षक, नाविन्यपूर्ण आणि गडचिरोली जिल्ह्याची ओळख प्रतिबिंबित करणारा ब्रँड लोगो व टॅगलाईन तयार करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत प्राप्त होणाऱ्या प्रवेशिकांमधून तज्ज्ञ समितीमार्फत सर्वोत्तम लोगो व टॅगलाईनची निवड करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 5 हजार रुपये, असे एकूण 30 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपले लोगो आणि टॅगलाईन 30 जून 2026 पर्यंत gadchiroli@umed.in या ई-मेलवर पाठवावेत. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे संपूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे.
अधिकाधिक नागरिक, विद्यार्थी, कलाकार, डिझायनर आणि सर्जनशील व्यक्तींनी या स्पर्धेत सहभागी होऊन गडचिरोलीच्या उत्पादनांना स्वतंत्र ओळख निर्माण करण्याच्या उपक्रमात योगदान द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे जिल्हा अभियान संचालक, तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
































