गडचिरोली : मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा महोत्सव 2026’ अंतर्गत गडचिरोलीत रविवारी (दि.26) एका ‘सांस्कृतिक महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने सायंकाळी 6 वाजता सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही सांस्कृतिक मेजवानी गडचिरोलीकरांसाठी नि:शुल्क राहणार आहे.
‘अजब गजब विचार मंच’ प्रस्तुत या सांस्कृतिक महोत्सवात पुण्याचे सुप्रसिद्ध गायक राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांचा सुरेल गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्याचबरोबर मुंबईतील नामांकित कलावंतांकडून गोंधळ, भारूड, कोळीगीत, जोगवा, धार्मिक व देशभक्तीपर गीत-नृत्य, तसेच महापुरुषांच्या जीवनगाथांवर आधारित विशेष नृत्याविष्कार सादर करण्यात येणार आहे. संगीत, नृत्य आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा सुरेख संगम असलेला हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रवेश पूर्णपणे नि:शुल्क असून, नागरिकांच्या सोयीसाठी प्रवेश पासेसची व्यवस्था करण्यात आली आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच कला आणि संस्कृतीप्रेमींनी कुटुंबासह मोठ्या संख्येने या सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी केले आहे.
‘अजब गजब विचार मंच’चे संस्थापक सतीश त्रिनगरीवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने पासेस घेऊन या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी व्हावे आणि या अविस्मरणीय सांस्कृतिक सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे.
































