Home क्राईम मिरची पावडर फेकून सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न

मिरची पावडर फेकून सराफा व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न

अर्धा किलो सोन्याचा डबा वाचला

गडचिरोली : दुकान बंद करून दुचाकीवरून घरी जात असलेल्या सराफा व्यावसायिकाला भर रस्त्यात लुटण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या झटापटीत चोरट्यांच्या हाती अर्धा किलो सोन्याच्या डब्याऐवजी जेवणाचा डबा लागल्याने लुटमारीचा प्रयत्न फसला. मात्र तमाम व्यापारीवर्गात या घटनेमुळे दहशत निर्माण झाली आहे.

सुरेश बाबुराव भोजापुरे (50 वर्ष) असे लुटण्याचा प्रयत्न झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. भोजापुरे हे दि.31 च्या रात्री 9.30 च्या सुमारास गोकुळनगरातील आपले सराफा दुकान बंद करून नेहमीप्रमाणे दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी गाडीच्या डिक्कीमध्ये अर्धा किलो सोन्याचे दागिने ठेवले होते. तर जेवणाच्या डब्याची पिशवी वर लटकवलेली होती. मात्र त्याच पिशवीत सोने असल्याचे समजून दुचाकीवरील दोघे लुटारू गुपचूपपणे त्यांचा पाठलाग करत होते.

भोजापुरे हे चामोर्शी रोडवरील जंगल कामगार सोसायटीच्या कार्यालयासमोरून जात असताना त्या काहीशा निर्जन स्थळी तोंडाला रूमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना गाठले आणि डोळ्यात मिरची पावडर भिरकावली. त्यामुळे भोजापुरे गोंधळून जाताच लुटारूंनी त्यांच्या गाडीला लटकवलेली पिशवी हिसकली आणि तेथून क्षणात पळ काढला. मात्र त्यात जेवणाचा डबा असल्याने भोजापुरे यांचे अर्धा किलो सोन्याचे (किंमत अंदाजे 80 लाख) दागिने वाचले.

पोलिसांचा धाक राहिलेला नाही?

दोन दिवसांपूर्वी शिवाजी कॅालेजसमोरही अशात पद्धतीने खेवले ज्वेलर्सचे संचालक नेताजी खेवले यांना अशाच पद्धतीने लुटण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यानंतर दोनच दिवसात लुटारूंनी पुन्हा त्याच पद्धतीने भोजापुरे यांना लुटण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांचा चोरट्यांना धाक राहिला नाही का, असा प्रश्न व्यापारीवर्गाकडून केला जात आहे. गडचिरोली पोलिसांनी गस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्याची मागणी व्यापारीवर्गाकडून करण्यात आली आहे.