आरमोरी : पूर्व विदर्भातील उत्कृष्ट संस्था चालक म्हणून आरमोरी येथील किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांना पुरस्कार देऊन चंद्रपूर येथे गौरविण्यात आले.
सदर सन्मान कर्तृत्वाचा हा सोहळा शिक्षक दिनाचे औचित्य साधून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, गोविंदराव वंजारी फाउंडेशन, तसेच गोविंद मैना फाउंडेशन चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित केला होता. प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह चंद्रपूर येथे रविवारी सकाळी 11 वाजता झालेल्या या सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रामुख्याने संस्थाचालक, शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विमाशि संघाचे सहकार्यवाह तथा आमदार सुधाकर आडबाले होते. आमदार अॅड.अभिजीत वंजारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अरविंद देशमुख, माजी आमदार आणि सरचिटणीस व्ही.यु.डायगव्हाणे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॅा.बबनराव तायवाडे, प्राचार्य शरयू तायवाडे, पुष्पा डायगव्हाणे, विमाशि संघाचे उमेदवार दिलीप कडू, गोविंद मैना फाउंडेशनचे अध्यक्ष सीमा अडबाले, गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या कोषाध्यक्ष स्मिता वंजारी, शिवाजी ढुमणे, मुख्याध्यापक राजेंद्र मस्के, जिल्हा कार्यवाह रवींद्र नैताम, तसेच तिन्ही जिल्ह्यातील विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ज्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा सुरू ठेवली, असे आरमोरी येथील किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, तसेच संताजी समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा अंबाबाई शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष भाग्यवानजी खोब्रागडे यांना यावर्षीचा उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गंगा गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू करून ते भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पसरविल्याने अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दालने मोफत त्यांनी उभी करून दिली, याचा उल्लेख यावेळी करण्यात आला.
आ.अभिजीत वंजारी यांनीही खोब्रागडे यांचे कौतुक करताना, सर्वसामान्य जनतेच्या मुलांना मोफत शिक्षणाची दारे खुले करून देणारे पूर्व विदर्भातील एकमेव संस्थाचालक म्हणजे भाग्यवान खोब्रागडे होत, असे गौरवोद्गार व्यक्त केले. पुरस्काराला उत्तर देताना भाग्यवान खोब्रागडे म्हणाले, आपण शिक्षणाचे कार्य हे अविरतपणे सुरू ठेवलेले असून समाजातल्या अगदी शेवटच्या घटकापर्यंतचे शिक्षण हे मोफत व दर्जेदार कसे मिळेल आणि त्या माध्यमातून भविष्यातील पिढी उत्तमपणे कशी निर्माण होईल यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहे, ते यापुढेही सुरू राहील. भविष्यात आमच्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून क्लास-वन क्लास-टू असे अधिकारी निर्माण करण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले.
या सन्मानासाठी आरमोरीकरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
































