Home दैनंदिन बातम्या दिल्लीतील ‘स्टुडन्ट फेस्टिवल’मध्ये गडचिरोलीच्या युवक-युवतींचा डंका

दिल्लीतील ‘स्टुडन्ट फेस्टिवल’मध्ये गडचिरोलीच्या युवक-युवतींचा डंका

आत्मसमर्पित माओवाद्यांचाही सहभाग

गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती, पारंपरिक कला, लोकपरंपरा आणि निसर्गाशी अतुट नाते सांगणा­ऱ्या जीवनशैलीचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण करण्याची संधी जिल्ह्यातील युवक-युवतींसह आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना मिळाली. 4 व 5 सप्टेंबर 2026 रोजी राजधानी दिल्लीत आयोजित ‘9 व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवल’ मध्ये गडचिरोलीच्या 18 जणांच्या चमुने पारंपरिक वाद्यांसह रेला नृत्याचे सादरीकरण करून महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व केले.

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ‘प्रोजेक्ट उडान’च्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवक-युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरीता ही संधी देण्यात आली.

दिल्ली येथे 4 व 5 सप्टेंबरला 9 व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्रातील 4 आत्मसमर्पित माओवादी सदस्य तसेच अनुप डान्स ग्रुपच्या 14 युवक-युवतींना दिल्ली येथील महोत्सवात सहभागी होण्यासाठी पाठविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या रेला नृत्याचे पारंपरिक वाद्यांसह गडचिरोलीच्या स्पर्धकांकडून मनमोहक सादरीकरण करण्यात आले.

आत्मसमर्पित माओवादी सदस्य व युवक-युवतींनी सादर केलेल्या या पारंपरिक नृत्याला उपस्थितांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. रेला नृत्य व पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्राची आदिवासी संस्कृती तसेच शांतता, एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश राष्ट्रीय मंचावर देण्यात आला.

आत्मसमर्पितांना मुख्य प्रवाहात येण्याची संधी

यासोबतच हिंसेचा व माओवादी विचारसरणीचा त्याग करून आत्मसमर्पण केलेल्या माओवादी सदस्यांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार, क्रीडा तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पुनर्वसन प्रक्रियेचा एक भाग म्हणून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना राष्ट्रीय स्तरावरील 9 व्या नॉर्थ-ईस्ट स्टुडन्ट महोत्सवात सहभागी होण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. या सहभागामुळे त्यांच्या आत्मविश्वासाला बळ, सुप्त कलागुणांना व्यासपीठ आणि समाजात सन्मानाने जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. यासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि.चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.