Home पब्लिक प्रॉब्लेम रस्त्याची समस्या दूर करण्यासाठी पाच गावातील नागरिक अहेरीत

रस्त्याची समस्या दूर करण्यासाठी पाच गावातील नागरिक अहेरीत

अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या

25 ते 28 किलोमीटर पायी चालत अहेरीकडे आगेकुच करताना नागरिक
अहेरीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करताना गावकरी

अहेरी : तालुक्यातील खांदला ग्रामपंचायत परिसरातील पाच गावांचा रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेथील शेकडो नागरिकांनी 28 किलोमीटरची पायपीट करत काल अहेरी गाठले. अहेरीच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठाण मांडले असून प्रशासनाने या रस्त्याबाबत ठोस निर्णय घेतल्याशिवाय हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला आहे.

आलापल्ली ते खांदला हा 22 किलोमीटरचा रस्ता मरनेली, चिरेपल्ली, कोत्तागुडम, पत्तीगाव आणि खांदला या गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. मात्र रस्ता पक्का रस्ता नसल्याने या गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही, तर आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते.

प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यात तरुणांसह महिला, वृद्ध आणि शालेय विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे महिलांनी अहेरीत काही दिवस मुक्कामाची वेळ आली तर त्यादृष्टीने आवश्यक साहित्याचे गाठोडेही सोबत आणले आहे.

चिरेपल्ली ते अहेरी असे 28 किलोमीटरचे अंतर पार करत हे आदिवासी बांधव काल दुपारपर्यंत अहेरीत दाखल झाले. अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आल्याचे दिसून येत आहे.