Home दैनंदिन बातम्या दुसऱ्याही दिवशी गावकऱ्यांचा ठिय्या, रस्त्याचे काम सुरू करण्याचा आग्रह

दुसऱ्याही दिवशी गावकऱ्यांचा ठिय्या, रस्त्याचे काम सुरू करण्याचा आग्रह

मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आज भेटणार

गडचिरोली : तब्बल 28 किलोमीटरची पायपीट करून अहेरीत दाखल झालेल्या खांदलासह पाच गावांमधील आदिवासी नागरिकांनी सलग दुसऱ्याही दिवशी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आपला ठिय्या कायम ठेवला. रस्त्याअभावी गेल्या 14 महिन्यांत सहा जणांना जीव गमवावा लागल्याचा दावा आंदोलकांनी केला. त्यामुळे आता ‘आश्वासन नको, प्रत्यक्ष काम सुरू करा’ असा निर्धार या गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरूद्ध पालकर हे आंदोलकांची भेट घेण्यासाठी जाणार आहेत. त्यामुळे आंदोलकांच्या मागणीवर तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिकाऱ्यांसमोर ठेवले मृत्यूचे दाखले

आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या 14 महिन्यांत रस्त्याअभावी वेळेवर उपचार मिळू न शकल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर मृत्यूचे दाखले ठेवत नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. रस्त्याचा प्रश्न केवळ प्रवासाच्या गैरसोयीपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो नागरिकांच्या जगण्या-मरण्याशी जोडला गेला असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

रुपाली आलाम यांनी तीन महिन्यांच्या मुलीला गमावल्याची वेदना व्यक्त केली. वेळेत रुग्णालय गाठण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसेल, तर दुर्गम भागातील नागरिकांनी उपचार मिळवायचे कसे, असा प्रश्न आंदोलनातून उपस्थित करण्यात आला. ‘गावात रस्ता असता, तर माझी तीन महिन्यांची मुलगी वाचली असती…’ असे म्हणत चिरेपल्ली येथील रुपाली मनोज आलाम यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या चिमुकलीच्या मृत्यूची कहाणी सांगितली. त्यातून या समस्येची तीव्रता दिसून आली. ‘रस्ता नसल्याने आणखी किती जणांचे बळी जाणार?’ असा सवाल करत नागरिकांनी पाच गावांना जोडणाऱ्या सुमारे 22 किलोमीटर रस्त्याचे काम प्रत्यक्ष सुरू करावे, अशी मागणी केली आहे.

डिसेंबरच्या आश्वासनावर आंदोलकांचे समाधान नाही

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवांश सिंह, तसेच प्रभारी अपर जिल्हाधिकारी शुभम पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. डिसेंबरपर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, आंदोलकांनी प्रत्यक्ष काम सुरू करण्याची मागणी कायम ठेवली. ‘आता आश्वासन नको; रस्त्याचे काम सुरू करा. तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील,’ अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे चर्चेनंतरही आंदोलनाचा निर्धार कायम राहिला.

अन्नधान्य, पाणी आणि मुक्कामाच्या साहित्यासह तयारी

नागरिकांनी तीन ट्रॅक्टरमधून अन्नधान्य, पाणी आणि झोपण्यासाठी आवश्यक साहित्य आणले. आंदोलनस्थळीच स्वयंपाक करण्याची त्यांची तयारी आहे. मागणी मान्य होईपर्यंत मुक्काम करण्याच्या तयारीने आलेल्या नागरिकांच्या भूमिकेतून रस्त्याच्या प्रश्नावरील तीव्र असंतोष व्यक्त झाला.

दरम्यान, 28 किलोमीटर पायी चालत आलेल्या काही महिला आणि मुलींची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी चांदेवार यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाहणी केली. आजारी आंदोलकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सहकार्य केले.